राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांना पक्षविस्तारासाठी मिळाले नवीन वाहन

ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते सुपूर्द

जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांना वाहनाच्या चाव्या देताना ना.धर्मरावबाबा आत्राम.

गडचिरोली : राज्यात नव्यानेच सत्तारूढ झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) गडचिरोली जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी एक पाऊल पुढे टाकत पदाधिकाऱ्यांना चारचाकी वाहने दिली आहेत. रविवारी गडचिरोली दौऱ्यावर असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना वाहनांच्या चाव्या देण्यात आल्या.

जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर यांचे जुने वाहन काढून त्यांना नवीन बोलेरो एल-१० हे वाहन देण्यात आले. याशिवाय अहेरी विधानसभा मतदार संघातील अहेरी, भामरागड आणि एटापल्ली येथील तालुका अध्यक्षांना नवीन वाहन देण्यात आले. या मतदार संघातील सिरोंचा आणि मुलचेरा तालुका अध्यक्षांना आधीच वाहन देण्यात आले आहे. यामुळे अहेरी विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस आपली पकड आणखी घट्ट करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे दिसून येते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास निरगोनवार, भामरागड तालुकाध्यक्ष रमेश मारगोनवार आणि एटापल्ली तालुकाध्यक्ष श्रीकांत कोकुलवार यांनी ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या स्वीकारल्या. यावेळी रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाचे संघटन गावागावात निर्माण करा, अशी सूचना यावेळी ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी पदाधिकाऱ्यांना केली.

लवकरच गडचिरोली विधानसभा क्षेत्र आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रासाठी एक-एक वाहन उपलब्ध केले जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी सांगितले.

भामरागडचे तालुकाध्यक्ष रमेश मारगोनवार यांना चाव्या सुपूर्द करताना ना.धर्मरावबाबा आत्राम.