विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची धानोऱ्याच्या टपरीवर रंगली ‘चाय पे चर्चा’

बडेजावपणा सोडून आठवणींना दिला उजाळा

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे बुधवारी दुपारी गडचिरोली-चिमूर मतदार संघातल्या चामोर्शी येथील प्रचारसभा आटोपून धानोरा येथे पोहोचले असताना त्यांनी रस्त्यालगतच्या एका छोट्या चहा टपरीवर कार्यकर्त्यांसोबत चहा घेतला. त्या चहा टपरीवरच रंगलेली कार्यकर्त्यांसोबतची त्यांची ‘चाय पे चर्चा’ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाली. राज्याच्या राजकारणातमहत्वाच्या पदावर विराजमान असताना ना.वडेट्टीवार पाय जमिनीवर ठेवून जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये रमतात याचा अनुभव सोबतच्या लोकांना सुखावून गेला.

पक्षाच्या आढावा बैठकीसाठी ना.वडेट्टीवार बुधवारी धानोरा येथे गेले होते. नक्षलग्रस्त धानोऱ्यात दोन दशकांपासून राजकारणात सोबत असलेली काही मंडळी त्यांना भेटली. त्यांनी चहा घेण्याचा आग्रह केला. त्यावर आनंदाने होकार देत वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयालगत असलेल्या एका छोट्याश्या चहा टपरीवर कार्यकर्त्यांसोबत गप्पांमध्ये रंगून चहाचा आनंद घेतला. जुने मित्र, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत चहाचा आस्वाद घेताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.