भामरागड तालुक्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट

भाग्यश्री आत्राम यांच्याकडून दुपट्टा देत स्वागत

भामरागड : कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम, तसेच माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भामरागड तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी २८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

भामरागड हा अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भाग असल्याने या तालुक्यातील दुर्गम भागात राजकीय मंडळींचा फारसा संपर्क नसतो. अशात मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांनी तालुक्यातील विविध गावात संपर्क वाढविला. त्यामुळे विविध गावांतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाग्यश्रीताईंनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत त्या सर्वांचे स्वागत करून त्यांना पक्षवाढीसाठी मार्गदर्शन केले. यात नगर पंचायत हद्दीतील मेडपल्ली, भामरागड टोला, हिनभट्टी तसेच राणीपोडुर, धोडराज आदी गावातील कार्यकर्त्यांचा समावेश होता.