आलापल्लीत विवाहित तरुणाची धारदार वस्तूने प्रहार करून मध्यरात्री हत्या

अनैतिक संबंध कारणीभूत? लवकरच उलगडा होणार

याच मोकळ्या जागेत राकेश कन्नाके याचा मृतदेह पडून होता.

अहेरी : आलापल्ली येथील श्रमिकनगर वार्ड क्रमांक १ मध्ये राहणाऱ्या राकेश फुलचंद कन्नाके (३५ वर्ष) या विवाहित तरुणाची धारदार वस्तुने प्रहार करून हत्या करण्यात आली. गोंडमोहल्ला वार्ड क्रमांक ४ मधील मोकळ्या जागेवार रविवारी सकाळी त्याचा जखमी अवस्थेतील मृतदेह आढळला. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टिने पोलिस संशयित आरोपींच्या मागावर आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

राकेश कन्नाके हा शनिवारी रात्री आपल्या घरी जेवण करून घराबाहेर पडला होता. पण रात्रभर तो घरी परतलाच नाही. रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास राकेशचा मृतदेह चिखलाने माखलेल्या स्थितीत गोंडमोहल्ल्यातील मोकळ्या जागेत आढळला. त्याच्या कपाळावर डाव्या बाजुने खोल जखम होती. तसेच चेहरा आणि नाकावर जखमा होत्या. पायावरही जड वस्तूने जोरदार प्रहार केल्याचे आढळले. त्यामुळे त्याची हत्या झाली हे स्पष्ट झाले.

पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अंगावरील जखमांची तीव्रता आणि शस्राचा अंदाज घेण्यासाठी फॅारेन्सिक टिमलाही पाचारण केले होते. दरम्यान या खुनामागील कारण आणि आरोपी यांचा लवकरच उलगडा होईल, असा विश्वास पो.निरीक्षक काळबांडे यांनी ‘कटाक्ष’सोबत बोलताना व्यक्त केला आहे.