आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निघणार महायुती, महाविकास आघाडींच्या रॅली

अभिनेत्री रिमी सेन, ना.वडेट्टीवार सहभागी होणार

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीत दुपारी ३ वाजेपर्यंतच जाहीर प्रचाराची मर्यादा असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीकडून सकाळी रॅली, रोड शो करून प्रचाराची सांगता केली जाणार आहे.

महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांच्या रोड शो मध्ये सुप्रसिद्ध हिंदी सिनेअभिनेत्री रिमी सेन यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. चामोर्शी मार्गावरील प्रचार कार्यालयातून सकाळी 8.30 वाजता या रोड शोला सुरूवात होणार आहे.

धूम, हंगामा, फिर हेराफेरी अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिमी सेन यांचे दि.16 ला आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांच्या चिमूर येथील निवासस्थानी आगमन झाले. यावेळी खासदार अशोक नेते व आमदार बंटी भांगडीया यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रितेश भट व राकेश कोठारी यांचेही ग्रामगीता व पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.

महाविकास आघाडीची रॅली

महाविकास आघाडीचे उमेदवार डॅा.नामदेव किरसान यांची रॅली सकाळी 10 वाजता त्यांच्या चंद्रपूर मार्गावरील प्रचार कार्यालयातून निघणार आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी या रॅलीत प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. शहराच्या प्रमुख मार्गावरून ही रॅली फिरणार आहे.