सुरळीत मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची कसरत, मदतीसाठी नऊ हेलिकॅाप्टर

आत्मसमर्पित नक्षलीही करणार मतदान

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात दि.19 एप्रिलला होऊ घातलेल्या मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेची खरी कसरत आता सुरू झाली आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यात मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 15 हजारांवर सुरक्षा जवानांचा फौजफाला लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे देखरेख करण्यासाठी आणि मतदान यंत्र व केंद्रांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी तब्बल नऊ हेलिकॅाप्टरची सेवा घेतली जात आहे.

राज्याच्या अनेक भागातील पोलिस गडचिरोलीत

गडचिरोली पोलिस दलातर्फे बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एपीएसपी, एसआरपीएफच्या 40 कंपन्या तसेच मुंबई रेल्वे पोलिस, नागपूर रेल्वे पोलिस, पिंपरी चिंचवड, पुणे शहर पोलिस, छत्रपती संभाजीनगर रेल्वे पोलिस, नवी मुंबई पोलिस, पुणे रेल्वे पोलिस असा विविध ठिकाणाहून एकूण 1500 च्या वर, तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव व इतर ठिकाणाहून 1750 च्या वर गृहरक्षक दलाच्या सुरक्षा जवानांसह एकूण 15 हजाराच्या वर सुरक्षा जवान जिल्ह्यातील संपूर्ण मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत.

नजर ठेवणारे आणि प्रतिहल्ला करणारेही ड्रोन

या सुरक्षा जवानांना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्रातील 361 अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात राहणार आहेत. त्यासाठी सी-60, शिघ्र कृतीदल, विशेष कृती दल, शिघ्र प्रतिसाद पथकाच्या 36 तुकड्यांमार्फत जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्रातील सर्व मतदान केंद्रांवर आकाशमार्गाने सुक्ष्म पाहणी करण्यासाठी अत्याधुनिक 130 ड्रोनसह ड्रोन टीम, आणि नक्षलवाद्यांच्या ड्रोनवर प्रतिहल्ला करण्यासाठी पाच अँटी ड्रोन गन देखिल सज्ज ठेवण्यात आल्या असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोणकोणते हेलिकॅाप्टर आले?

निवडणूक काळात मतदान केंद्रापर्यंत जाण्या-येण्याच्या मार्गावर बॅाम्बरोधक वाहनांच्या मदतीने सुमारे 750 कि.मी. रोड ओपनिंग अभियान राबविण्यात येणार आहे. यासोबतच भारतीय वायुसेनेचे तीन एमआय-17, तसेच दोन एएलएच आणि भारतीय लष्कराचे दोन एएलएच असे एकूण सात हेलिकॉप्टर गडचिरोली पोलिस दलाच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या सोबतीला गडचिरोली पोलिस दलाचे दोन हेलिकॉप्टर मिळून एकुण नऊ हेलिकॉप्टरची मदत घेतली जाणार आहे. विविध संवेदनशिल व अतिसंवेदनशिल ठिकाणी मतदान कर्मचाऱ्‍यांना त्यातून पाठविण्यात येणार आहे.

हेलिकॉप्टरच्या मदतीने अहेरी विधानसभा मतदार संघातील 68 मतदान केंद्रांवरील 295 कर्मचाऱ्‍यांना, केंद्रावर पाठविण्याची प्रक्रिया 16 एप्रिलपासूनच सुरु करण्यात आली.आवश्यकतेनुसार उर्वरित मतदान अधिकाऱ्यांना हवाई वाहतुकीद्वारे मतदान केंद्रावर सुरक्षितपणे पाठविण्यात येणार आहे. बुधवारी गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातील मतदान कर्मचाऱ्यांना हेलिकॅाप्टरने पाठविले जाणार आहे.

615 पोलिस कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले आहे. यासोबतच 158 आत्मसमर्पित नक्षलवादी मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक अहेरी एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा दल सज्ज झाले आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन निर्भयपणे मतदान करणयाचे आवाहन पो.अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.