आमगावच्या पुरातन राम मंदिरात तेवताहेत नऊ दिवसांपासून १८३ अखंड ज्योतिकलश

आज साजरा होणार रामनवमी उत्सव

देसाईगंज : शहरापासून तीन किलोमीटरवर असलेल्या आमगाव येथील पुरातन राममंदिरांत बुधवारी रामनवमी उत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील हे एकमेव पुरातन राममंदिर आहे. गेल्या नऊ दिवसांपासून या मंदिरात 183 अखंड ज्योतिकलश तेवत आहेत.

चैत्र शुद्ध नवमी प्रतिपदेपासून नऊ दिवस येथे उत्सव चालतो. श्रीराम मंदिर ट्रस्टमार्फत श्री भागवत् सप्ताहाचे आयोजन केले आहे. यात रामायणाचे पारायण, कथाकीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार केला जातो. अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.

चैत्र शुद्ध नवमी या चैत्रातील नवरात्रीचा नवव्या दिवशी श्रीरामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा होणार आहे. यात श्रीरामाचा पाळणा हलवत भक्‍तमंडळीकडून गुलाल व फुलांची उधळण केली जाते. त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा, आरतीनंतर सुंठवड्याबरोबर महाप्रसादही दिला जातो.

रामनवमी निमित्ताने राम मंदिर ट्रस्टच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्याचेही आयोजन करून सामाजिक दायित्व निभावल्या जाते. परंतु कोरोनाकाळापासून सामुहिक विवाह सोहळ्याला खंड पडला आहे.

रामाची उपासना करणाय्रा रामभक्तांसाठी नऊ दिवसांचे अखंड ज्योती कलश मंदिराजवळील भवनात ठेवले जातात. यावर्षी 183 ज्योती तेवत आहेत.

राम मंदिराचा रंजक इतिहास

या राम मंदिराचा इतिहास मोठा रंजक आहे. आमगावात दिडशे वर्षांपूर्वी घनदाट आमराईने वेढलेल्या ठिकाणी एक महाराज आले होते. ते तप करित होते. या तपोभूमीत ते आपल्या अनुयायांना राख द्यायचे म्हणून त्यांना राखडे महाराज असे संबोधले जात होते. त्यातून अनेकांना लाभ होत असल्याने हे ठिकाण प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागले. या राखडे महाराजांच्या सांगण्यावरून अर्जुनी मोरगाव येथील प्रसिद्ध उद्योगपती ब्रिजलाल पालीवाल यांनी याठिकाणी जयपूर येथून प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानाच्या साडेतीन फुटांच्या उंचीच्या मूर्ती आणून मंदिरात मूर्तींची पुनर्स्थापना केली. जवळपास दोन एकरात हे राम मंदिर विस्तारले आहे. सन १९९४ मध्ये खोब्रामेंढा, टिपागड, मार्कंडासह या राम मंदिराची शासनाने नोंद घेऊन “क” दर्जा पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. पर्यटन निधी व आमदार कृष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून येथे २ कोटीची कामे केली आहेत.