गडचिरोली : राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी गुरूवारी माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी अशोक नेते आणि अर्चना नेते यांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत व सत्कार केला.
याप्रसंगी ना.उईके यांनी मा.खा.नेते यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा त्यांनी उल्लेख करत विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी माजी खासदार अशोक नेते यांच्या सामाजिक योगदानाचेही कौतुक केले.
या भेटीच्या वेळी प्रामुख्याने आ.डॉ.मिलिंद नरोटे, मा.आ.डॉ.नामदेव उसेंडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या स्वागतानंतर ना.उईके यांनी नेते कुटुंबीयांसमवेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.