महागाई वाढवून लाडक्या बहि‍णींची लूट, ही निवडणूक विचारांची लढाई

गडचिरोली, चामोर्शीत ना.वडेट्टीवारांचा प्रहार

गडचिरोली : महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करत भाजपने पक्षफोडीचे राजकरण केले. जनावरांच्या खरेदी-विक्रीप्रमाणे खोके देऊन आमदार विकत घेत सरकार स्थापन केले. यांच्या काळात देशात व राज्यात महागाई, बेरोजगारी वाढली. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन लगेच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविले. एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने दुप्पट वसुल करणाऱ्या या सरकारला सत्तेतून पायउतार करा, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. गडचिरोली आणि चामोर्शी येथे शुक्रवारी घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

या सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे केंद्रीय सचिव तिवारी, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान, महाविकास आघाडी व घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार मनोहर पोरेटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, सुरेश सावकार पोरेड्डीवार, आरपीआय नेते ॲड.राम मेश्राम, बालाजी गाडे, विश्वजीत कोवासे, रजनीकांत मोटघरे, प्रतीक बारसिंगे, चामोर्शीच्या नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, नितीन वायलालवार, वैभव भिवापुरे यांच्यासह चामोर्शी व गडचिरोली येथील महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.वडेट्टीवार म्हणाले, ही केवळ राज्याची निवडणूक नसून दोन विचारांची लढाई आहे. या लढाईत एकीकडे संविधान परिवार तर दुसरीकडे संघ परिवार आहे. तुम्हाला योग्य निवड करायची आहे.

यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान म्हणाले, लोकसभेत तुम्ही एकजुटीने कार्य केले. यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव शक्य झाला. हे आरक्षणविरोधी व धर्मांधतेचे विष पेरणारे सरकार सत्तेतून पायउतार करा, असे आवाहन त्यांनी केले. माझ्या प्रामाणिक कार्यकाळावर तसेच माझ्या शिक्षणाबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. याबाबत सतर्क राहून मला लोकप्रतिनिधीत्वाची संधी द्यावी, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पोरेटी यांनी केले.