गडचिरोली : जमशेटची टाटा झारखंडमधील जमशेटपूर (टाटानगर) येथे पोलाद कारखाना उभारण्याआधी गडचिरोली जिल्ह्यात आले होते. सुरजागडला ते घोड्यावर बसून गेले होते. या ठिकाणी पोलादाचा कारखाना उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. पण वनविभागाने परवानगी दिली नाही. अन्यथा जमशेटपूरसारखे विकसित महानगर गडचिरोली जिल्ह्यात वसलेले दिसले असते, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आष्टीतील जाहीर सभेत व्यक्त केली.
स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले ना.नितीन गडकरी यांनी आष्टी येथील प्रचारसभेत वनअधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर चांगलाच संताप व्यक्त केला. हे अधिकारी झारीतील शुक्राचार्य आहेत. कोणत्याही विकासात्मक कामात वनकायदा घुसवून वनविभागाचे अधिकारी ती कामे अडवतात. ते सरळ झाल्याशिवाय गडचिरोली जिल्ह्याचा विकास होणार नाही, असे म्हणत माझ्या हातात हे अधिकारी सापडतील त्यावेळी त्यांची चांगली धुलाई (शाब्दिक) केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे वनविभागाच्या अडवणुकीमुळे थांबली असल्याचे ना.गडकरी यांनी स्पष्ट केले. मी पर्यावरणवादी आहे. मी राष्ट्रीय महामार्गांवर साडेचार कोटी झाडं लावली आहेत. वनविभाग झाडे लावत नाही पण पर्यावरणाच्या नावाखाली विकास कामांमध्ये अडथळे आणते. मी सरकारमध्ये असलो तरी मला वनविभागाच्या कार्यप्रमाणीमुळे होणारा त्रास सहन करावा लागतो. अडलेल्या कामांवर माझे लक्ष आहे. त्यातून मार्ग काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गडचिरोली सर्वात संपन्न जिल्हा होणार
जिल्ह्यात नक्षलवाद रुजण्यामागे सामाजिक, आर्थिक प्रगतीचा अभाव हे कारण होते. या क्षेत्रातील खनिज संपत्तीमुळे मोठे उद्योग उभारण्याची क्षमता या जिल्ह्यात आहे. त्यामुळे भविष्यात हा जिल्हा राज्यातील सर्वात सुखी आणि संपन्न जिल्हा होईल, असा विश्वास ना.गडकरी यांनी व्यक्त केला.