गटप्रवर्तक व आशा वर्करचे जेलभरो आंदोलन, गडचिरोली पोलिस ठाण्याचे आवार भरले

1315 कर्मचाऱ्यांना करून ठेवले स्थानबद्ध

गडचिरोली : शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा, किमान वेतन, दिवाळी भाऊबीज भेट लागू करणे आदी मागण्यांवर योग्य तोडगा न निघाल्याने 21 व्या दिवशीही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच होता. दरम्यान मंगळवारी गडचिरोलीत गटप्रवर्तक आणि आशा वर्कर यांनी महामार्गावर ठिय्या देऊन जेलभरो आंदोलन केले. यावेळी दिवाळीच्या दिवशी आमदार, खासदार व मंत्री यांच्या घरासमोर काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा आयटक या संघटनेने दिला.

आरोग्य खात्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटनेशी संलग्न असलेल्या आयटकच्या वतीने गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी, वार्षिक वेतनवाढ, अनुभव बोनस तर आशा वर्करला किमान वेतन, दिवाळी भाऊबीज भेट आणि ऑनलाईन कामावर बहिष्कार या मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करण्यात आले.

आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी गोंडवाना भवन येथून दुपारी 1 वाजता केंद्र व राज्य सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करत थाळीनाद करत गांधी चौकापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर चौकात सभेत रूपांतर होऊन आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, भारतीय कॅाम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य डॅा.महेश कोपुलवार यांनी सरकारच्या कामगार किसान धोरणाचा समाचार घेतला. त्यानंतर गांधी चौकात 20 मिनिटे रास्ता रोको करत संताप व्यक्त केला. यामुळे काहीकाळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. पोलिस प्रशासन आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वादही झाला. पोलिसांनी बळजबरी करत आंदोलनाच्या नेत्यांना गाडीत घेऊन गेले.

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेऊन पोलिस स्टेशनवर मोर्चा काढत जेलभरो केले. यामधे जिल्हाभरातील 1315 आशा व गट प्रवर्तकांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली.