गडचिरोली-चिमूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार का?

काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ऐका

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) निर्धार नवपर्वाचा हा संवाद मेळावा मंगळवारी गडचिरोलीत उत्साहात झाला. अभिनव लॅानच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कॅबिनेट मंत्री पक्षाचे नेते धर्मरावबाबा आत्राम, महिला प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या जिल्ह्यातील रखडलेले काही प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर आपल्या मार्गदर्शनात तटकरे यांनी याबाबतचा निर्णय आपण घेऊ शकत नसलो तरी या मुद्द्याची नोंद घेणार असल्याचे सांगितले. तसेच मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. कोणत्या परिस्थितीत आम्ही महायुतीत सहभागी झालो यापासून तर लोकसभेच्या जागावाटपावर कधी चर्चा होणार याबद्दलही त्यांनी सांगितले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात लोकसभेच्या किती जागा अपेक्षित आहेत या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.

या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.