गडचिरोली : कोणत्याही पुरेशा सुविधा नाहीत. धावण्याचा सराव करण्यासाठी रनिंग ट्रॅक नाही. खाण्यासाठी पोषक अन्नसुद्धा नाही. पण दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या जोरावर गडचिरोली जिल्ह्यातील एका छोट्या गावातील आदिवासी युवक, धावपटू म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख बनवू पहात आहे. लच्चा दुग्गा वेलादी असे या युवकाचे नाव आहे. आॅक्टोबर महिन्यात दुबई येथे होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
अहेरी तालुक्यातील किष्टापूर (दोडगेर) या दुर्गम आणि नक्षलग्रस्त गावातील लच्चा दुग्गा वेलादी या युवकाचे आठवडीपर्यंतचे शिक्षण देचलीपेठा येथील आदिवासी आश्रमशाळेत झाले. तेव्हापासूनच त्याला धावण्याची आवड होती. नववीपासून बारावीपर्यंत पेरमिली येथील आश्रमशाळेत शिकत असताना तो छोट्याशा जागेत, नदीतील वाळूत धावण्याचा सराव करत होता. यादरम्यान प्रशिक्षक रविंद्र भांदककर यांनी त्याच्यातील कौशल्य ओळखून त्याला आदिवासी विकास विभागाकडून दरवर्षी भरविल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये उतरविले. त्यात त्याने दोन वेळा सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याच्यातील धावपटूला प्रोत्साहन आणि योग्य वातावरण मिळण्यासाठी नागपूर आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी बीए प्रथम वर्षासाठी त्याला नागपूरच्या कॅालेजमध्ये प्रवेश मिळवून दिला.नागपूरच्या मानकापूर स्टेडियममध्ये सराव करताना त्याच्या कौशल्याला आणखी गती मिळाली. दि.28 ते 30 जुलै 2023 दरम्यान हरियाणातील पानीपत येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अँथलेटीक्स प्रकारात लच्चा याने 400 मिटरमध्ये महाराष्ट्र चमूकडून खेळताना सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे दुबई सरकारकडून 6 ते 9 आॅक्टोबरदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता त्याची निवड झाली.
लच्चा याच्या मदतीसाठी सरसावले हात
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता लच्चा वेलादी याची निवड झाल्याचे कळताच त्याला प्रोत्साहन आणि मदत करण्यासाठी काही लोक पुढे आले. त्याची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे गडचिरोलीचे माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी त्याला आपल्या रुक्मिणी महलमध्ये बोलवून त्याचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच दुबई येथे येण्याजाण्यासाठी आर्थिक मदत केली. तसेच माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनीही त्याला आर्थिक मदतीचा हात पुढे केला.