प्रांतपाल डॉ.रिपल राणे यांची गडचिरोली लॉयन्स क्लबला भेट

'शेवटच्या घटकापर्यंत सेवा द्या'

गडचिरोली : लॅायन्स क्लबचे झोन चेअरपर्सन दीपक मोरे, रिजन चेअरपर्सन डॉ.श्रीकांत जोशी तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ डॉ.रिपल राणे यांनी गडचिरोलीला भेट देऊन लॅायन्स क्लबच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी क्लबची सेवा समाजातील शेवटच्या घटनापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

या भेटीनिमित्त लॉयन्स क्लब गडचिरोलीतर्फे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात “मानवता हाच खरा धर्म” यावर प्रा.संध्या येलेकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून सुंदर असे स्लोगनचे चित्र रेखाटले होते. माजी अध्यक्ष सतीश पवार यांच्या कल्पनेतून गडचिरोलीच्या आदिवासी संस्कृतीला जपत रिना उईके हिने तयार केलेल्या सिंधीच्या पानाच्या मुकुटाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पाहुण्यांच्या स्वागतार्थ गार्गी दीपक मोरे हिने मनोवेधक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. क्लबची कार्यप्रणाली तपासणीसाठी आणि क्लबच्या सदस्यांना प्रोत्साहित व मार्गदर्शन करण्यासाठी सदर भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ.रिपल राणे यांनी सांगितले की, लायन्स क्लब इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठी सामाजिक संस्था असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी अनेक वेळा सरकारच्या अगोदर लायन्स क्लब तिथे पोहोचते. गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा लायन्स क्लबने दोन वेळा पूरग्रस्तांना मोठी मदत केली आहे. हा जिल्हा आजही अनेक मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. येथे सेवेची फार मोठी संधी असून “मानवता हाच खरा धर्म” या भावनेतून क्लबने सेवा द्यावी आणि लायन्स क्लबचे कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नवीन सदस्य डॉ.बिडकर, अनिल धाईत, नितीन मुलकलवार आणि शेखर आखाडे यांना लायन्स क्लबची पिन देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ज्या सदस्यांनी क्लबमध्ये 15 ते 20 वर्ष सेवा दिली त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पाहुण्यांची ओळख नंदिनी चिलमवार यांनी दिली. सूत्रसंचालन संध्या चिलमवार यांनी तर आभार सचिव नितीन चेंबुलवार यांनी मानले.