राष्ट्रीय लोकअदालतीत 400 प्रकरणे तडजोडीने निकाली

दीड कोटीहून अधिकची वसुली

गडचिरोली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये वर्षातील चौथी व शेवटची राष्ट्रीय लोकअदालत यशस्वीपणे पार पडली. या लोकअदालतीत एकूण 400 प्रकरणे तडजोडीने निकाली काढून दीड कोटींपेक्षा जास्त रकमेची वसुलीही करण्यात आली.

यात तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी स्वरूपाची प्रकरणे, धनादेश नापसंतीबाबत एन.आय.अॅक्ट अंतर्गत प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, कौटुंबिक वाद, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, तसेच दाखलपूर्व वादांचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत वीज बिल प्रकरणे, पतसंस्था व बँकांची थकीत कर्ज प्रकरणे, फायनान्स कंपन्यांची कर्ज वसुली प्रकरणे, ग्राहक न्यायालयातील दावे तसेच मोटार वाहन कायद्यान्वये चालान प्रकरणे लोकअदालतीसमोर ठेवण्यात आली होती.

जिल्हाभरात 10 पॅनलसमोर सुनावणी

संपूर्ण जिल्ह्यात एकूण 10 पॅनल स्थापन करण्यात आले होते. या पॅनलसमोर एकूण 332 प्रलंबित खटले व 68 दाखलपूर्व वाद प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. लोकअदालतीच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 59 लाख 66 हजार 507 रुपये इतकी रक्कम वसुल झाली. निकाली निघालेल्या एकूण प्रकरणांपैकी 270 प्रकरणे गुन्हा कबुलीच्या माध्यमातून निकाली काढण्यात आली.

जिल्हा न्यायालय गडचिरोली येथील पॅनल क्रमांक 2 समोर आपसी समझोत्यासाठी आलेल्या एका वैवाहिक वादाच्या प्रकरणात पती-पत्नी यांच्यात समझोता होऊन पत्नी पुन्हा संसारासाठी नांदायला गेल्याने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी उभयतांचा सत्कार करून लोकअदालतीच्या सामाजिक महत्त्वावर प्रकाश टाकला.

संपूर्ण लोकअदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष विनायक जोशी, सचिव अंकुश खानोरकर यांच्या देखरेखीखाली करण्यात आले.