Home पब्लिक प्रॉब्लेम पूरग्रस्त कुंभी गावातील तिघांना जिल्हा प्रशासनामार्फत सुरक्षित बाहेर काढले

पूरग्रस्त कुंभी गावातील तिघांना जिल्हा प्रशासनामार्फत सुरक्षित बाहेर काढले

नोकरी, परीक्षा व उपचारासाठी रवाना

गडचिरोली : अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गडचिरोली तालुक्यातील मौजा कुंभी येथील तीन नागरिकांना जिल्हा प्रशासनाने तातडीने बचावकार्य राबवून सुरक्षितपणे बाहेर काढत आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

कुंभी येथील समीर विजय गेडाम (25 वर्ष) यांची राजस्थान येथे बँक मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांना रुजू होण्यासाठी तातडीने प्रवास करणे आवश्यक होते. तसेच तुलसी नवबोध गेडाम (21 वर्ष) यांची नागपूर येथे परीक्षा असल्याने त्यांनाही गावाबाहेर काढणे गरजेचे होते. याशिवाय दिलीप पितांबर गेडाम (50 वर्ष) यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी नेणे आवश्यक होते.

या संदर्भात गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ एसडीआरएफ पथक आणि जिल्हा पोलिसांचे बचाव पथक बोट व आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी रवाना केले.

एसडीआरएफचे पोलीस निरीक्षक जी.जे. खोब्रागडे तसेच जिल्हा पोलीस बचाव पथकातील प्रेमानंद टेकाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी समन्वयाने बचाव मोहीम राबवून तिन्ही नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर संबंधितांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पुढील प्रवास व वैद्यकीय उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.