गडचिरोली : येथील तहसील कार्यालयात महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सागर कांबळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार चंदु प्रधान, ज्ञानेश्वर ठाकरे, एस.पी. शेख उपस्थित होते.
याप्रसंगी नायब तहसीलदार चंदु प्रधान, प्रशांत धात्रक (मंडळ अधिकारी), मोरेश्वर पटले (सहायक महसूल अधिकारी), छाया टेकाम, जेप्रा (ग्राम महसूल अधिकारी), राखी भैसारे (महसूल सहायक), साधना जुमनाके (शिपाई), आणि निखिल बांबोळे (निवडणूक ऑपरेटर) यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना तहसीलदार कांबळे यांनी महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून जनसामान्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे सांगितले.
सत्कारमुर्ती चंदु प्रधान यांनी महसूल विभागाची का्र्यपद्धती व जबाबदाऱ्या सांगताना जवळपास 57 प्रकारची न्यायिक प्रकरणे या विभागामार्फत चालवली जात असल्याचे सांगितले. मृत्यूपूर्व जवाब, ओळख परेड, राष्ट्रीय सण, तसेच सर्व धर्मात साजरे होणारे सणवार, महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी, मिरवणूक तसेच इतर धार्मिक बाबीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या विभागाला काम करावे लागते. शिवाय शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय सातबारा उतारा, आठ अ, फेरफार, शेतातील पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून त्यांना अनुदान मिळवून देणे, शेतीचे वाद, अतिक्रमण, पाणंद रस्ते, त्यावरील अतिक्रमण काढणे ही कामेसुद्धा या विभागाकडून केली जातात. पण ही सर्व कामे जबाबदारीने महसूल अधिकारी आणि कर्मचारी पार पाडत असल्याचे ते म्हणाले.
महसुली कर्तव्याशिवाय जवळपास 120 प्रकारची अतिरिक्त कामे या विभागाच्या अंतर्गत केली जातात. बहुचर्चित पीएम किसान योजना व ॲग्रीस्टॅक योजना यशस्वी करण्यात महसूल विभाग आणि त्यात तलाठी, मंडळ अधिकारी यांचे योगदान खूप मोठे असल्याचे ना.तहसीलदार प्रधान म्हणाले.
































