Home दैनंदिन बातम्या सोडे येथील शासकीय आश्रमशाळेला विश्वजीत कोवासे यांची सदिच्छा भेट

सोडे येथील शासकीय आश्रमशाळेला विश्वजीत कोवासे यांची सदिच्छा भेट

विद्यार्थ्यांशी संवाद साधत घेतली माहिती

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अॅड.विश्वजित कोवासे

धानोरा : जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय आश्रमशाळेला अचानक भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक, निवासी व दैनंदिन सुविधांची माहिती जाणून घेतली.

भेटीदरम्यान त्यांनी आश्रमशाळेतील स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांना वेळेवर व दर्जेदार आहार मिळत आहे की नाही, याची सविस्तर माहिती घेतली. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुरक्षित वातावरण आणि सर्व आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पाहणीदरम्यान आश्रमशाळेत शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आवश्यक मनुष्यबळाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व दैनंदिन सुविधांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व समस्या शासनाच्या निदर्शनास आणून त्या तातडीने सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आश्रम शाळांमध्ये आवश्यक सुविधा, पुरेसे शिक्षक व कर्मचारी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशी ठाम भूमिका जिल्हाध्यक्ष कोवासे यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी जि.प.सदस्य विनोद लेनगुरे, नगरसेवक रमेश चौधरी, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, सरपंच संजय गावडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.