
गडचिरोली : सोमवारी पहाटेपासून अचानक बदललेल्या वातावरणानंतर संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह बरसलेल्या वादळी पावसाने शेतातील पिकांना फटका बसला आहे. दक्षिण गडचिरोलीत या पावसाचा जोर जास्त होता. त्यामुळे कापूस, हरभरा, गहू आणि मक्यासारख्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोमवारी पहाटे काही भागात हलका पाऊस झाला. मात्र संख्याकाळी 5.30 ते 6 दरम्यान झालेल्या वादळी पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. अनेक शेतकऱ्यांची कापूस वेचणी अजून बाकी आहे. त्यामुळे झाडावरच हा कापूस भिजला. याशिवाय चण्याला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. वादळी पावसामुळे ऐन भरीस असलेले मक्याचे पिक काही भागात आडवे झाले.
दक्षिण भागातसह उत्तर भागातील कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी तालुक्यातही काही प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
































