गडचिरोली : ग्राम पंचायत मुरखळाअंतर्गत नवेगाव(कॅाम्प्लेक्स) सुयोगनगर येथील वियाणी विद्यानिकेतनकडे जाणारा 80 मिटरचा रस्ता फेब्रुवारी 2026 मध्ये बांधण्यात आला. मात्र सदर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या कडा (साईडिंग) संबंधित कंत्राटदाराने अद्यापही मुरमाने किंवा गट्टूने भरलेल्या नाहीत. त्यामुळे सदर रस्त्यावरील वाहतूक नेहमीच जाम होत असते. यातून अपघातही घडू शकतात. त्यामुळे सदर रस्त्याच्या कडा भरण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाला निवेदन सादर केले.
सदर रस्ता हा वियाणी विद्यानिकेतन शाळेकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. शाळेच्या वेळेत व ईतर वेळेत रस्ता अरुंद (साईडिंग न भरल्यामुळे) असल्यामुळे येणारी-जाणारी दोन वाहने एका वेळेस पास होत नाहीत. तसेच या रस्त्याला लागुन असलेला पुढचा 100 मिटरचा रस्ता हा अंदाजे 2 वर्षापूर्वी बांधण्यात आला होता. मात्र सदर रस्त्यावर जागोजागी अनेक खड्डे पडलेले असल्यामुळे शाळेच्या वेळेत रहदारीला अडचण निर्माण होत आहे. या रस्त्यावरून शाळकरी मुलांची ये -जा असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परिसरातील नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन जेष्ठ नागरिक संस्था गडचिरोलीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्याची विनंती करण्यात आली. निवेदन देताना जेष्ठ नागरिक संस्था तालुका गडचिरोलीचे अध्यक्ष एच.ए. पठाण, सचिव प्रभाकर कुबडे, उमेश आखाडे, जयदेव चिचघरे व जिल्हा शाखेचे सचिव सुधाकर बावणे उपस्थित होते.
































