Home दैनंदिन बातम्या युपीएससी उत्तीर्ण रजत वाळके यांचे ‘प्लॅटिनम’मध्ये मार्गदर्शन

युपीएससी उत्तीर्ण रजत वाळके यांचे ‘प्लॅटिनम’मध्ये मार्गदर्शन

माजी विद्यार्थ्याकडून मिळाली प्रेरणा

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रजत वाळके

गडचिरोली : कधी वर्गात बसून स्वप्न पाहणारा विद्यार्थी, आणि आज त्याच शाळेत उभा राहून शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा भावी सनदी अधिकारी ! असे चित्र प्लॅटिनम ज्युबिली शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले. केंद्रिय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण करून भावी सनदी अधिकारी होणाऱ्या रजत सुनील वाळके यांनी प्लॅटिनम ज्युबिली शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना भावी करिअरबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेचा माजी विद्यार्थी असलेल्या रजत यांच्या स्वप्नपूर्तीनंतर त्यांनी विद्यमान विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना केले हे प्रेरणादायी मार्गदर्शन म्हणजे स्वप्न आणि वास्तव यांचा सुंदर संगम होता.

रजत वाळके यांच्या प्रत्येक शब्दात अनुभव, संघर्ष आणि यशाची ताकद जाणवत होती. त्यांनी सुरुवातीलाच एक साधा पण प्रभावी संदेश दिला की, “यश हे मोठ्या गोष्टींमध्ये नसतं… ते रोजच्या छोट्या सवयींमध्ये दडलेलं असतं.” विद्यार्थीदशेत अभ्यासाला प्रथम प्राधान्य, प्राधान्यक्रम निश्चिती आणि 24 तासांचे नियोजन हे यशाचे तीन आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जर्नलिंगबद्दल त्यांनी सांगितलेले विचार विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजले. “तुमच्या स्वप्नांची एक डायरी असू द्या. दररोज त्यात स्वतःशी संवाद साधा. तुम्ही काय शिकलात, कुठे चुकलात, पुढे काय करायचं, हे लिहित राहिलात, तर तुम्ही स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक बनता.” त्यांनी डोपामिन ऑटोपायलटपासून दूर राहण्याचा सल्ला देत, ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करा आणि इयत्ता पाचवी ते दहावीची एनसीईआरटी पुस्तके हीच खरी पायाभरणी आहे असे सांगितले. युपीएससीच्या प्रवासाचे वास्तव उलगडताना त्यांनी नमूद केलेस “पूर्वपरीक्षा हे प्रवेशद्वार आहे, मुलाखत अंतिम टप्पा आहे, पण मुख्य परीक्षा ही खरी लढाई आहे.”

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिली उत्तरे

या मार्गदर्शन सत्रात दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले आणि त्यांना अत्यंत प्रामाणिक व वास्तववादी उत्तरे मिळाली. कोणता विषय निवडावा? या प्रश्नावर त्यांनी “जिथे आवड, तिथेच सातत्य… आणि जिथे सातत्य, तिथेच यश!” असे सांगितले. अभ्यास कसा करावा? यावर “तास मोजू नका, समज वाढवा. गुणवत्तापूर्ण अभ्यास करा,” असे मार्गदर्शन केले. वेळेचे नियोजन कसे करावे? या प्रश्नावर “प्रत्येक दिवस जिंका… वर्ष आपोआप जिंकाल!” हा प्रभावी संदेश त्यांनी दिला. पर्यावरण अभियांत्रिकीसाठी काय करावे, यावर त्यांनी विज्ञान शाखा घेऊन अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्याचा आणि पुढे विशेषीकरण करण्याचा सल्ला दिला. आयएएस बनताना आलेल्या आव्हानांबाबत बोलताना त्यांनी मानसिक थकवा आणि एकसुरीपणावर सातत्य आणि आत्मविश्वासाने मात करण्याचे महत्त्व सांगितले. डिझाइनिंग क्षेत्रात जाण्यासाठी सर्जनशीलता विकसित करून पोर्टफोलिओ तयार करण्यावर भर दिला. पगार आणि उत्पन्न यामधील फरक स्पष्ट करताना त्यांनी पगार म्हणजे निश्चित मासिक उत्पन्न, तर उत्पन्न म्हणजे विविध स्रोतांमधून मिळणारी एकूण कमाई असे सोप्या शब्दांत सांगितले. काम पुढे ढकलण्याची सवय टाळा, कुतूहल जिवंत ठेवा, ‘नेहमी जिज्ञासू राहा आणि बौद्धिक व भावनिक बुद्धिमत्तेचा समतोल साधा’ असा जीवनमंत्र दिला.

विद्यार्थ्याकडून शिकण्याचा क्षण

यावेळी प्राचार्य रहीम अमलानी म्हणाले, “आज आम्ही शिक्षक म्हणून नव्हे, तर शिकणारे म्हणून उभे आहोत. आपल्या स्वतःच्या विद्यार्थ्याकडून शिकण्याचा हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. जर्नलिंग, शिस्त आणि उत्पन्नाविषयी त्यांनी मांडलेले विचार हे त्यांच्या शालेय शिक्षणातील मूल्यांचेच प्रतिबिंब आहे. ‘राष्ट्रसेवा’ हा आमच्या संस्थेचा मूलभूत उद्देश असून, तो आज त्यांच्या कार्यातून साकार होताना दिसतो.”

यावेळी शाळेच्या वतीने रजत वाळके यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे शैक्षणिक प्रमुख अमीन नुरानी, उपप्राचार्य पारस गुंडावार, शिक्षकवृंद तसेच इयत्ता दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करत “आज आम्ही फक्त आयएएस अधिकारी पाहिला नाही, तर आमच्यासारखाच एक विद्यार्थी यशस्वी होताना पाहिला,” “युपीएससी आता अवघड वाटत नाही… ती एक दिशा वाटते,” आणि “आजपासून आमची ‘स्वप्नांची वही’ सुरू झाली आहे!” अशा भावना व्यक्त केल्या.