गडचिरोली : बदलत्या हवामानामुळे अल्पकालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी दिले. त्यांनी शुक्रवारी (दि.31) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक एम.रमेश, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सहपालकमंत्र्यांनी पूरप्रवण भागातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत नागरिकांना वेळेवर सतर्क करणे, पुराचा इशारा मिळताच त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे आणि बचाव कार्यात कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
नदीकाठावरील, तसेच पूररेषेतील (ब्लू लाईन व रेड लाईन) वस्तींचे सर्वेक्षण करून तेथील नागरिकांची अद्ययावत माहिती तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वारंवार पुराचा धोका असलेल्या कुटुंबांची ‘मास्टर लिस्ट’ तयार करून त्यांच्या सुरक्षित पुनर्वसनासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
पूरपरिस्थितीत बचाव कार्य अधिक प्रभावी होण्यासाठी बोटी, लाईफ जॅकेट्स, लाईफ रिंग्स, दोरखंड यांसह आवश्यक साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याबरोबरच एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन व पोलिसांची बचाव पथके सतत सज्ज ठेवण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले.
नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पूरप्रवण गावांमध्ये जनजागृती अभियान राबवून नागरिकांना पूरकाळातील सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे, स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करणे आणि आवश्यकतेनुसार लाईफ जॅकेटचे वितरण करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.
पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या लहान पुलांवरून नागरिक जीव धोक्यात घालून वाहने किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करतात. अशा घटना टाळण्यासाठी संबंधित ठिकाणी बॅरिकेड्स उभारणे, धोक्याचे इशारा फलक लावणे, तसेच स्थानिक प्रशासनामार्फत सातत्याने देखरेख ठेवण्याचे निर्देश सहपालकमंत्री यांनी दिले.
गरोदर माता व गंभीर रुग्णांना उपचार मिळावे
आरोग्य विभागाच्या आढाव्यादरम्यान दुर्गम भागातील गरोदर माता व गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना सहपालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी अलीकडील घटनेत रुग्णाला रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले होते; मात्र पुढील मार्ग पूरग्रस्त झाल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नसल्याची माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा सादर करताना भामरागड तालुक्यातील परिस्थिती आता नियंत्रणात येत असून नदीपात्रातील पाणी ओसरत असल्याचे सांगितले. पुरात अडकलेल्या नागरिकांची बोटींच्या साहाय्याने सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.
भामरागडसाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज
जिल्हाधिकारी पंडा यांनी पुढे सांगितले की, मुसळधार पावसामुळे काही दुर्गम भागांतील वीजपुरवठा आणि दूरसंचार सेवा तात्पुरत्या खंडित झाल्याने संपर्क व्यवस्थेवर परिणाम झाला. संबंधित विभागांच्या समन्वयातून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून भामरागडसारख्या पूरप्रवण भागासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत पूरपूर्व तयारी, बचाव कार्य, आरोग्य सेवा, वीज व दूरसंचार व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता, जनजागृती आणि पूरप्रवण भागांच्या पुनर्वसनासंदर्भातील उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून नागरिकांच्या जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्कतेने कार्य करावे, असे निर्देश सहपालकमंत्री जयस्वाल यांनी यावेळी दिले.
































