Home पब्लिक प्रॉब्लेम उपजिल्हा रुग्णालयातील डॅाक्टरांना इतरत्र डेप्युटेशनवर पाठवू नये

उपजिल्हा रुग्णालयातील डॅाक्टरांना इतरत्र डेप्युटेशनवर पाठवू नये

आ.रामदास मसराम यांची मागणी

आरमोरी : येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी अत्यावश्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांना इतरत्र डेप्युटेशनवर पाठविण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत आमदार मसराम यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

यावेळी त्यांनी उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेतली. रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा, औषधोपचार, स्वच्छता, मनुष्यबळ व इतर आवश्यक सेवांची माहिती घेतली. भेटीदरम्यान रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ.मिलिंद रामटेके व डॉ.समीर नाकाडे यांना तात्पुरत्या स्वरूपात अहेरी येथे डेप्युटेशनवर पाठविण्यात आल्यामुळे आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञांची कमतरता निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना, तसेच नवजात व लहान बालकांना तज्ज्ञांची सेवा उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना विनाकारण गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करावे लागत असल्याची बाब आ.मसराम यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावर मसराम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रुग्णांना वेळेवर, दर्जेदार, संवेदनशील आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

औषधांचा पुरेसा साठा, स्वच्छता, उपचारांची गुणवत्ता आणि रुग्णांशी सौजन्यपूर्ण वर्तन याकडे विशेष लक्ष देण्याचेही त्यांनी सांगितले. आरमोरी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे डेप्युटेशन तातडीने रद्द करून आवश्यक डॉक्टरांची सेवा पूर्ववत करावी, जेणेकरून प्रसुत माता, नवजात बालके आणि सर्वसामान्य रुग्णांना स्थानिक स्तरावरच दर्जेदार उपचार मिळू शकतील, अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली.

यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष (आरमोरी) मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, नगरसेवक धनपाल मिसार, नगरसेवक अक्षय बागडे, सागर वाढई, अनिल किरमे, वैद्यकीय अधीक्षक राजकुमार कोरेटी, डॉ.धात्रक, डॉ.अश्विनी रामटेके, वरिष्ठ परिचारिका माया पारधी, तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.