गडचिरोली : मराठी नववर्षारंभाच्या मंगलमय वातावरणात गुरूवारी गुढीपाडव्याच्या पर्वावर माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. नववर्षाच्या शुभेच्छांसह त्यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर यावेळी चर्चा केली. प्रामुख्याने धानाच्या प्रलंबित असलेल्या चुकाऱ्यांचा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. (अधिक बातमी खाली वाचा)

या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, स्थानिक अडचणी आणि विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः दुर्गम भागांतील पायाभूत सुविधा, दर्जेदार रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आवश्यक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी मा.खा.डॉ.नेते यांनी गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले. शासनाच्या खरेदी केंद्रांवर धान विक्री करूनही अनेक शेतकऱ्यांचे चुकारे अद्याप प्रलंबित असल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पुढील हंगामाचे नियोजन करणे कठीण होत असून त्यांच्या उपजीविकेवरही परिणाम होत आहे, अशी अडचण त्यांनी मांडली. (अधिक बातमी खाली वाचा)

शेतकऱ्यांचे सर्व प्रलंबित धान चुकारे तात्काळ अदा करण्यासाठी संबंधित विभागास निर्देश द्यावेत, अशी गळ नेते यांनी घातली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. (अधिक बातमी खाली वाचा)

ही भेट केवळ औपचारिक न राहता गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी ठरेल, असा विश्वास नेते यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे यांचीही उपस्थिती होती.




































