अहेरी : डॉ.बाबासाहेबांच्या ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण कार्यामुळे आणि संविधानामुळे सर्वांना गुण्यागोविंदाने नांदता येत आहे. त्यांच्याच पुण्याईने आम्ही आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधी बनत आहे. त्यांचे उपकार कदापीही फेडता येणार नाहीत, असे प्रतिपादन आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयात बुधवारी सामाजिक समता सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आ.डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय सोमकुंवर, तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, प्रमुख वक्ते सुरेंद्र अलोणे , सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन जंगमवार आदी उपस्थित होते.
या सप्ताहाला सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, सचिव प्रशांत पोटदुखे व मंडळाचे अन्य पदाधिकारी तथा सदस्यांनी संदेश पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. सामाजिक समता सप्ताह 14 एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार असून यात विविध विषयांवर वक्त्यांच्या व्याख्यानमाला व नाविन्यपूर्ण उपक्रमे राबविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन जंगमवार यांनी, तर संचालन प्रा.डॉ.सोनाली वाघ यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.नामदेव पेंदाम यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
































