Home राजकीय घडामोडी एटापल्लीत पं.दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान उत्साहात

एटापल्लीत पं.दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान उत्साहात

मा.खा.डॉ.नेते यांचे मार्गदर्शन

एटापल्ली : भारतीय जनता पक्ष एटापल्ली मंडळाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – 2026 अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. एटापल्लीतील कन्यका माता मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.

माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन, वंदे मातरम् आणि भाजपाचे सामूहिक गीत गाऊन उत्साहपूर्ण वातावरणात कार्यशाळेची सुरूवात झाली.

विचारधारा तळागाळात पोहोचवा

अध्यक्षस्थानावरून बोलताना मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या विचारधारेबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले. प्रत्येक कार्यकर्त्याने निष्ठा, समर्पण आणि प्रामाणिकपणाने काम करत केंद्र व राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहोचवणे हेच खरे पक्षकार्य आहे, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री मुद्रा योजना यांसारख्या अनेक जनकल्याणकारी योजनांमुळे देशातील शेतकरी, महिला, गरीब आणि वंचित घटकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत आहे.

सामाजिक सुरक्षेच्या योजनांबाबत बोलताना त्यांनी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना यांचा उल्लेख करत या योजनांनी गरजू नागरिकांना आधार दिल्याचे सांगितले.

संघटनेतून समाजसेवा–राजकीय प्रवासाचा उल्लेख

मा.खा.डॉ.नेते यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की, त्यांनी भाजप युवा मोर्चातून कार्यास सुरुवात केली आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले. तीन वेळा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्य करताना समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष केला. गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार म्हणून 10 वर्षांच्या कार्यकाळात वडसा–गडचिरोली रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात, मेडिकल कॉलेज, सुरजागड लोह प्रकल्प, कोनसरी स्टील प्लांट, गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, हवाई पट्टी मंजुरी, सुमारे 15 हजार कोटींची रस्ते विकास कामे, तसेच कोटगल व चिचडोह बॅरेज यासारख्या सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

यावेळी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना “पक्षात मतभेद ठेवू नका, जुने विसरा आणि नवीन कार्यकर्त्यांना जोडा. त्यांना सक्रिय करा आणि जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर रहा. कुठेही अपघात किंवा अडचण आली तर कार्यकर्त्यांनी त्वरित पोहोचावे. गोरगरिबांच्या सेवेत स्वतःला झोकून द्यावे. घरी बसून न राहता जनतेच्या सतत संपर्कात राहा. जनतेच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन केले.

कार्यशाळेची वैशिष्ट्यपूर्ण रुपरेषा

या प्रशिक्षणात नोंदणी, उद्घाटन सत्र, विविध विषयांवरील मार्गदर्शन, सोशल मीडिया प्रशिक्षण,आणि समारोप अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता. या सत्रांमधून कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क तंत्र याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, अवधेशराव आत्राम, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, सहकार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आशिष पिपरे, एटापल्ली तालुका अध्यक्ष प्रसाद पुल्लुरवार, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, जिल्हा सचिव दिलीप चलाख, जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गुंफावार, जिल्हा सदस्य विजय नल्लावार, तालुका महामंत्री राकेश हिरा, भाजयुमो तालुका अध्यक्ष यवत पुलके, कार्यालय प्रमुख अदितिय उपगलवार, तालुका उपाध्यक्ष सागर मंडल, तालुका महामंत्री संपत पैडाकुलवार, गणपत नैताम, मोहन नामेवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.