
आलापल्ली : येथील उपसरपंच तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार हे दरवर्षी गरजवंत नागरिकांसाठी अन्नधान्य किट वाटपाचा उपक्रम राबवितात. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत सातत्याने राबविला जाणारा हा उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला. दि.11 एप्रिल रोजी येथील शासकीय विश्रामगृहात माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या नेतृत्वात अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
एटापल्ली व अहेरी येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्गासाठी आलेल्या डॉ.नेते यांच्या हस्ते गरजवंतांना धान्याच्या किट वाटण्यात आल्या. भारतीय जनसंघाचे प्रणेते व विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेली ‘अंत्योदय’ ही संकल्पना प्रत्यक्ष साकारण्याचा एक प्रयत्न म्हणून आकनपल्लीवार यांचा हा उपक्रम सुरू आहे. गरीब, दलित, वंचित, शोषित आणि पिडीत घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा ध्यास प्रेरणादायी ठरत आहे. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान हे या उपक्रमाचे खरे यश मानले जाते.
या कार्यक्रमाला मच्छीमार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन मदने, युवा नेते सागर डेकाटे, सुकमल हलदार तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
































