सिरोंचा : तीव्र उन्हाचा फटका मानवी जीवासह मुके प्राणी आणि पक्षांनाही बसत आहे. तापमानाच्या बाबतीत जिल्ह्यात हॅाट असलेल्या सिरोंचा येथे सलग तिसऱ्या दिवशी काही वटवाघूळ मृतावस्थेत आढळले आहेत. मृत वटवाघुळांची एकूण संख्या आता 500 पेक्षा जास्त गेल्याचे सांगितले जाते
जिल्ह्यात तापमान 46.4 अंशावर गेले आहे. सिरोंचा येथे तापमान आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजुस असलेल्या वनविभागाच्या कार्यालय परिसरात मोठी झाडं आहेत. त्यातील चिंचेच्या झाडावर मोठ्या संख्येने वटवाघुळं असतात. पण तीव्र ऊन आणि पाण्याची कमतरता यामुळे वटवाघुळांना उष्णतेचा त्रास होऊन एकाच वेळी शेकडो वाटवाघळांचा मृत्यू झाला. त्यातील काही खाली पडलेली होती तर काही झाडावरच मृतावस्थेत लटकताना दिसली. रविवार ते मंगळवार या तीन दिवसात 500 पेक्षा जास्त वटवाघुळांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान वटवाघुळांना वाचवण्यासाठी पाण्याची व्यवस्था केल्याचे वनविभागाने सांगितले. मात्र त्यानंतरही हे मृत्यूसत्र थांबलेले नसल्यामुळे वनविभागाच्या उपाययोजना कुचकामी ठरल्याचे दिसून येते.
































