
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे. आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली, कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे या ‘आंबा महोत्सव-2026’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते झाले.
या महोत्सवात गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील 217 गावांमधून संकलित केलेल्या स्थानिक आंबा वाणांचे प्रदर्शन भरविण्यात आले. कोयतूर, बीईओ, विशाखा स्थानिक, रसराज यासह विविध स्थानिक वाण प्रदर्शनात मांडण्यात आले. आकाराने मोठ्या असलेल्या ‘कलेक्टर’ वाणाच्या आंब्यानेही लक्ष वेधून घेतले. या प्रदर्शनातून उत्कृष्ट वाणांची निवड करून त्यांचे संशोधन, संवर्धन व पुढील प्रसार करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
जिल्हाधिकारी गावंडे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात आंबा लागवडीस मोठी संधी आहे. फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून आंबा लागवडीला चालना द्यावी.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माच्या प्रकल्प संचालक, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संशोधक, विषय विशेषज्ञ तसेच जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते































