गडचिरोली : गेल्या अनेक वर्षातील तापमानाचा उच्चांक गाठत यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात पारा 46.4 अंशांवर पोहोचला आहे. उन्हाच्या झळांनी होरपळून निघत असलेल्या गडचिरोलीकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. हवामान विभागाने उष्णतेचा रेड व आॅरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले आहे.
आरमोरी येथील ग्रामीण रुग्णालयात एका 28 वर्षीय महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. ही महिला ब्रह्मपुरी येथील रहिवासी आहे. ती आरमोरी येथे आलेली असताना तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला गंभीर अवस्थेत आरमोरीच्या रुग्णालयात दाखल केले असताना उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तीव्र उन्हामुळे प्रकृती बिघडून तिचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताचे 19 रुग्ण आढळले. त्यांच्यापैकी 18 जणांवर यशस्वीपणे उपचार झाले, मात्र एका महिलेला वाचविण्यात यश आले नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.वर्षा लहाडे यांनी सांगितले.
































