Home पब्लिक प्रॉब्लेम वडसा-अर्जुनी मार्गाच्या दुरुस्तीसाठी आमदारांच्या नेतृत्वात ‘रास्ता रोको’

वडसा-अर्जुनी मार्गाच्या दुरुस्तीसाठी आमदारांच्या नेतृत्वात ‘रास्ता रोको’

संध्याकाळी दिड तास वाहतूक ठप्प

रास्ता रोको नंतर आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करण्यासाठी घेऊन जाताना पोलीस

देसाईगंज : वडसा (देसाईगंज) ते अर्जुनी (जि.गोंदिया) या महत्त्वाच्या आणि वर्दळीचा मार्गाची गेल्या अनेक महिन्यांपासून दूरवस्था होऊन रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी वारंवार शासनाकडे मागणी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने रविवारी संध्याकाळी आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात वडसा–अर्जुनी टी-पॉईंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, वाहनचालक, महिला तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाढलेल्या अपघातांच्या घटनांबाबत नागरिकांनी नारेबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला.

यावेळी आ.मसराम म्हणाले, वडसा–अर्जुनी मार्ग शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा आहे. मात्र या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. मार्गाच्या दुरुस्तीसाठी अनेकदा शासन व संबंधित विभागाकडे निधीची मागणी करण्यात आली. मात्र सरकारमधील आमदारांना भरीव निधी दिला जातो, पण विरोधी पक्षांतील आमदारांना तोकडा निधी देऊन दुजाभाव केला जातो, असा आरोप त्यांनी केला.

नागरिकांच्या भावना आणि संताप शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हा रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकर सुरू करावे, अन्यथा जनतेसोबत आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही मसराम यांनी दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी चालू वर्षाच्या बजेटमध्ये निधी मंजूर करून या रस्त्याचे काम पूर्ण करू, असे आश्वासन आमदार मसराम यांना मोबाईलवरून बोलताना दिले.

या आंदोलनामुळे काही काळ वडसा–अर्जुनी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळासाठी स्थानबद्ध केले. त्यानंतर हे आंदोलन समाप्त होऊन वाहतूक सुरू झाली.

आंदोलनात काँग्रेस कमिटीचे देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे. माजी उपसभापती नितीन राऊत, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, माजी जिल्हा परिषद सदस्य जयमाला पेंदाम, माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान, नगरसेविका आशा दहिवले, नगरसेविका फेमिदा पठाण, नगरसेविका मंदा समर्थ, हंसराज लांडगे, इलियास पठाण, कमलेश बारस्कर, डोमजी दिवटे, सागर वाढई, खेमराज प्रधान, कैलास राणे, आरती लहरी, प्रकाश सांगाडे, गजेंद्र नाईक, गणेश करपते, उपसरपंच गजानन सेलोटे, अरुण कुंभरवार, प्रकाश समर्थ, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर भर्रे, सचिन राऊत, राजेंद्र कोडपे, देवनाथ सयाम, प्रमोद मेश्राम, राजकुमार मेश्राम, नंदू चावला, प्रभाकर राऊत, शीला मेश्राम, अस्मिता रामटेके, पुष्पा बोदेले, हाजरा शेख, सुशीला गजभिये, मुक्ता चंडीकार, कैलास बगमारे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.