गडचिरोली : पुरेशा सिंचन सुविधांअभावी मर्यादित उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील 4 उपसा सिंचन योजनांना मंजुरी दिली. यासंदर्भात आपल्या पाठपुराव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याची भावना माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
मंजूर करण्यात आलेल्या उपसा सिंचन योजनांमध्ये सिरोंचा तालुक्यातील रंगायपल्ली उपसा सिंचन योजना, रमेशगुडम उपसा सिंचन योजना, मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम उपसा सिंचन योजना तसेच चामोर्शी तालुक्यातील राजीव-चिचचोड उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. या चार योजनांमुळे 48 गावांमधील 9 हजार 573 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असल्याची माहिती डॅा.नेते यांनी दिली.
वंचित असलेल्या शेतकरी बांधवांच्या जीवनात आर्थिक समृद्धीचा नवा अध्याय निर्माण व्हावा, शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने राज्य शासनाने हा अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील, विकासाभिमुख आणि शेतकरीहिताच्या नेतृत्वामुळे हा निर्णय शक्य झाल्याचे डॅा.नेते यावेळी म्हणाले.
गडचिरोली हा शेवटच्या टोकावरील आदिवासीबहुल व दुर्गम जिल्हा असल्याने येथील शेतकऱ्यांना सिंचन सुविधांच्या अभावामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा, शेती उत्पादनात वाढ व्हावी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळावे या उद्देशाने मा.खा.डॅा.अशोक नेते यांनी दि.18 मे 2026 रोजी मुख्यमंत्री कार्यालय, जलसंपदा विभाग तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे या चारही उपसा सिंचन प्रकल्पांसंदर्भात सविस्तर निवेदन सादर करून सातत्याने पाठपुरावा केला. त्या प्रयत्नांना आणि राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेला यश मिळून या चार महत्त्वपूर्ण योजनांना मंजुरी प्राप्त झाली आहे.
असा मिळेल योजनांचा लाभ
रंगायपल्ली उपसा सिंचन योजनेचा लाभ 14 गावांना, रमेशगुडम उपसा सिंचन योजनेचा लाभ 5 गावांना, राजीव-चिचडोह उपसा सिंचन योजनेचा लाभ 14 गावांना तर शांतीग्राम उपसा सिंचन योजनेचा लाभ 15 गावांना होणार आहे. सुमारे 722.95 कोटी रुपयांच्या या चारही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे हजारो शेतकरी कुटुंबांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.
यावेळी बोलताना डॉ.नेते यांनी सांगितले की, या योजनांच्या मंजुरीसाठी विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांची गंभीर दखल घेत सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, नगर परिषद बांधकाम सभापती तथा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, गोवर्धन चव्हाण, डॉ.भारत खटी, सुधाकर पेटकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
































