गडचिरोली : अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टमधील काही लोकांनी भाविकांकडून प्राप्त देणग्यांवर डल्ला मारल्याच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी, गुरूवारी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून भजन सत्याग्रह करण्यात आला. चंद्रपूर मार्गावरील फुटका हनुमान-राम मंदिरासमोर प्रभू रामाची भजने गात हा सत्याग्रह करण्यात आला. हाती विविध फलके घेऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात आले. घोटाळेबाजांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांनी केला.
या रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलनात अनेक रामभक्त आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्रीराम जन्मभूमि, तीर्थक्षेत्र अयोध्या येथील दानपेटी व देणग्यांच्या व्यवस्थापनाबाबत विविध माध्यमांमध्ये व सार्वजनिक चर्चेत होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय, ट्रस्टी अनिल मिश्रा आणि कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्याविरुद्ध झालेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून चौकशीत कोणताही गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, देशभरातील लाखो रामभक्त श्रद्धेने मंदिरात देणग्या अर्पण करतात. त्यामुळे देणग्यांच्या व्यवस्थापनात पूर्ण पारदर्शकता राखली जावी आणि जनतेचा विश्वास अबाधित राहावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी वस्तुनिष्ठ चौकशी करणे आवश्यक आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राम मेश्राम, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, गटनेते तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक नंदू कायरकर, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, उपाध्यक्ष निकेश गद्देवार, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद लेनगुरे, नंदु वाईलकर, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावळ, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज ढोरे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विवेक घोंगडे, ज्येष्ठ नेते प्रभाकर वासेकर, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, ज्येष्ठ नेते शंकरराव सालोटकर, जितू मुनघाटे, सोनू अलाम, मिलिंद खोब्रागडे, शितल ठवरे, कविता उराडे, रिता गोवर्धन, प्रा.अर्चना राजेश चन्नावार, मीनल चिमूरकर, सरपंच संजय गावडे, निकेश कामीडवार, अभिजीत घाईत, मदन मडावी, गजेंद्र नाईक, हेमंत कोवासे, विलास चिचघरे, आशिष घेर, विजय लाड, ओमप्रकाश चौधरी, हेमंत मोहितकर, चोखाजी बांबोळे, सचिन गावतुरे आदी उपस्थित होते.
































