Home दैनंदिन बातम्या रील आणि फोटोंच्या नादात आपला जीव धोक्यात घालू नका – वनविभाग

रील आणि फोटोंच्या नादात आपला जीव धोक्यात घालू नका – वनविभाग

रानहत्तीपासून सावध राहण्याचे आवाहन

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात, विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानहत्तींचा वावर सुरू आहे. मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये, यासाठी वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र काही नागरिक रानहत्तींचे फोटो, व्हिडिओ आणि सोशल मीडियासाठी ‘रील्स’ तयार करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक आर्या व्ही.एस. आणि वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी भेंडेकर यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

रील आणि फोटोंच्या नादात नियमांचे उल्लंघन

हत्तींच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी, ‘प्रायमरी रिस्पॉन्स टीम’ आणि ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ दिवस-रात्र परिसरात गस्त घालत आहेत. यासोबतच, हत्तींच्या स्थानाबाबतची आणि हालचालींची अचूक माहिती गावकऱ्यांना सातत्याने दिली जात आहे, जेणेकरून नागरिक सतर्क राहू शकतील. मात्र काही उत्साही लोक या माहितीचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे. वनविभागाने सुरक्षेच्या कारणास्तव उभारलेले बॅरिकेड्स (कठडे) ओलांडून काही नागरिक थेट हत्तींच्या जवळ जाण्याचा धोका पत्करत आहेत. रानहत्तींचे फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे आणि सोशल मीडियासाठी रील्स तयार करणे या नादात अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत.

वनविभागाचे आवाहन आणि इशारा

वनविभाग करत असलेले सर्व प्रयत्न आणि उपाययोजना या केवळ आणि केवळ सामान्य नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी वनविभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे. कोणत्याही परिस्थितीत हत्तींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका.”
तसेच, परिसरात हत्ती दिसून आल्यास किंवा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन अशा संवेदनशील परिस्थितीत जबाबदारीने वागावे, अशी अपेक्षा वनविभागाकडून व्यक्त केली जात आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी भेंडेकर यांनी रात्रीच्या वेळी जंगलालगतच्या भागात किंवा हत्तीच्या वावराच्या परिसरात विनाकारण जाणे टाळावे, वन्यप्राणी आक्रमक होणार नाही अशा प्रकारे सुरक्षित अंतर राखावे, गर्दी करू नये आणि हत्ती दिसल्यास किंवा त्याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.