
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक गावाच्या परिसरातील शेतांवर संध्याकाळी ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करत असलेल्या तीन लोकांना गावकऱ्यांनी पकडून ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले. त्यांचे ड्रोनही जप्त केले. वरिष्ठ अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही आणि डांबून ठेवलेल्या लोकांनाही सोडणार नाही, अशी भूमिका घेत रात्री उशिरापर्यंत शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायत परिसरात ठिय्या दिला होता.
महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने आंदोलन करणाऱ्या विमानतळ, जेएसडब्ल्यू आणि वरद फेरो अलॅायच्या प्रकल्पबाधित गावकऱ्यांना सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी तीन महिनेपर्यंत कोणत्याही हालचाली होणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ असेल, असे जाहीरपणे सांगितले होते. त्याबाबत प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे पत्रही आंदोलनकर्त्यांना दिले होते. असे असताना गुरूवारी संध्याकाळी ड्रोन कॅमेऱ्यांनी शेतजमिनीचे सर्व्हेक्षण सुरू असल्याचे पाहून मुधोलीच्या गावकऱ्यांमध्ये संतप्त भावना उफाळून आल्या.
हे सर्व्हेक्षण वरद फेलो अलॅाय या कंपनीसाठीच असल्याचा दाट संशय आल्याने त्यांनी सर्व्हेक्षण करणाऱ्यांना पकडून ग्रामपंचायत कार्यालयात डांबले. पाहतापाहता संपूर्ण गावकरी आणि काही शेजारच्या गावांचेही लोक त्या परिसरात जमले. दरम्यान या स्थितीची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार प्रशांत घारुडे आणि आष्टी पोलीस स्टेशनचे पथकही गावात पोहोचले. यावेळी तहसीलदार घारुडे यांनी हे सर्व्हेक्षण रस्ता मोठा करण्यासाठी असावे, असा अंदाज व्यक्त करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांना आपल्या बोलण्याला आवर घालावा लागला. त्यानंतर गावकऱ्यांनी ड्रोन घेऊन आलेल्या लोकांना तुम्हाला कोणी पाठवले, असे विचारले. त्यांनी आम्हाला मुंदडा नामक व्यक्तीने सर्व्हेक्षण करण्यासाठी पाठवले असे सांगितले. यावरून हे सर्व्हेक्षण वरद फेरो कंपनीकडूनच सुरू असल्याचा गावकऱ्यांचा संशय अधिक पक्का झाला.
गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, अहेरीचे एसडीपीओ हे गावात पोहोचले. पण गावकरी कोणाचेही ऐकत नव्हते. शेवटी 11.30 च्या सुमारास अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन दाखल झाले. त्यांनी हे सर्व्हेक्षण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगत गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्री 12 वाजेपर्यंत हा तिढा सुटलेला नव्हता.
































