Home दैनंदिन बातम्या चामोर्शीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सांगता, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार

चामोर्शीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सांगता, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार

आ.नरोटे, अधिकाऱ्यांनी केली शिष्टाई

चामोर्शी : भेंडाळा परिसरातील एमआयडीसीकरिता शेतजमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात 14 गावांमधील नागरिकांनी गुरूवारी दुपारी 12 पासून सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाची 31 तासानंतर, म्हणजे शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता सांगता करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आक्षेपांवरील सुनावणी तात्पुरती स्थगित करण्यासोबत या विषयावर मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याने हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. (खाली वाचा)

चामोर्शीतील हत्ती गेट चौकासह इतर गावांना जोडणारे सर्व प्रमुख मार्ग आंदोलक शेतकऱ्यांनी अडवून धरण्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे चामोर्शीतील शाळांनाही सुटी देण्यात आली. गुरूवारी दिवसभर उन्हात बसल्यानंतर शेतकरी महिला-पुरूषांनी रात्री मुक्कामही त्याच ठिकाणी केला होता. पोलिसांनीही बॅरिकेटिंग करून आंदोलकांची काळजी घेतली. दरम्यान गुरूवारी रात्री 11 वाजता उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी आंदोलनस्थळी येऊन भेट दिली आणि शेतकऱ्यांची मागणी काय आहे हे समजून घेतले.

शुक्रवारी सकाळी आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनी आंदोलनस्थळी दाखल होऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. मुख्यमंत्र्‍यांनी शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले. डॅा.नरोटे यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादाची माहिती शेतकऱ्यांना दिली. मात्र शेतकरी आंदोलन थांबवायला तयार नव्हते.

दरम्यान सायंकाळी पुन्हा उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्या कार्यालयात शेतकरी प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. एमआयडीसी टप्पा क्र.7 च्या भूसंपादनासंदर्भात आयोजित सुनावणी स्थगित करण्याचे आश्वासन आणि मुख्यमंत्र्यांशी बैठक घेण्यासंदर्भात डॅा.नरोटे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 31 तासपर्यंत अडून असलेली वाहतूक सायंकाळी 7 वाजता पुन्हा सुरू झाली आहे.