सरकारी कर्मचारी संघटनांचे आज गडचिरोलीत धरणे आंदोलन

मागण्यांसाठी दोन तास देणार ठिय्या

गडचिरोली : राज्यातील 17 लाख सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनांच्या वतीने दोन तास धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

नवनिर्वाचित सरकार सध्या भक्कम पायावर उभे असूनही 100 दिवसांच्या कार्यकाळात मंदावलेल्या स्थितीत आहे. कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शनचा प्रश्न 1 मार्च 2024 च्या अंमलबजावणी दिनांकापासून सोडविल्याचे घोषित करण्यात आले. परंतु त्यासंदर्भातील कार्यपध्दती व नियम विषद करणारा शासन निर्णय अद्याप जारी झालेला नाही. जे कर्मचारी 1 मार्च 2024 नंतर सेवानिवृत्त झाले आहेत ते अद्याप पेन्शन लाभापासून वंचित आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची हजारो रिक्त पदे भरण्यात यावी, आश्वासित प्रगती योजनेद्वारा वरिष्ठ वेतनश्रेणीतील अन्याय दूर करावा, सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांना कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक आरोग्य विमा योजना लागू करावी, तथा ग्रामविकास विभागाकडे महासंघाने सादर केलेल्या 34 मागण्यांबाबत तत्काळ विचार करावा, अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन केले जात आहे.

सर्व प्रवर्गातील संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी या धरणे आंदोलनात दुपारी 2 वाजता सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, निमंत्रक सुनील चडगुलवार, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, तसेच दुधराम रोहणकर, भास्कर मेश्राम, लतिफ पठाण, किशोर सोनटक्के आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेही धरणे

राज्यातील शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघटना गडचिरोलीचे अध्यक्ष अशोक काचिनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते, कार्याध्यक्ष संदीप भरणे, उपाध्यक्ष प्रमोद येलमुले तसेच नंदलाल लाडे, शैलेश कापकर, अरुण धोडरे, हेमंत रामटेके, भूपेश वैरागडे, अभिजित शिवणकर, हरिश्चन्द्र डोमळे, बंडू शिवणकर आदींनी केले आहे.