गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीतील सिरोंचा, अहेरी आणि एटापल्ली तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांना व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने गावांमध्ये जाऊन घोंगडी बैठका घेतल्या. या भेटीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी खाली बसून शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.
अहेरी तालुक्यातील ताटीगुडम येथे पार्लकोट शेतकरी उत्पादक कंपनीसाठी घोंगडी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी बाजारपेठ, व्यवसाय नियोजन आणि शेती उत्पादन वृद्धीबाबत संधींवर चर्चा करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी गौण वनउपज संकलन आणि प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी आवश्यक साधनसामग्री, ब्रँडिंग, पॅकिंग आणि बाजारपेठ उपलब्ध करण्याबाबत माहिती दिली.
जिल्ह्यातील सेंद्रिय गौण वनउपजाचे प्रमाणीकरण केले तर त्याचा कसा अधिकाधिक फायदा करून घेता येईल व तालुक्याचे सेंद्रिय प्रमाणिकरण कसे करता येईल या संदर्भात चर्चा करण्यात आली.
सिरोंचातील प्राणहिता व ज्ञानांजल शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांसोबत रोमपल्ली येथे, तर एटापल्ली येथे जनबंधू शेतकरी उत्पादक कंपनी आणि गडचिरोली ट्राईब्जच्या सभासदांसोबतही बैठका घेण्यात आल्या. यामध्ये शेतकऱ्यांना मोहफूल प्रक्रिया, चारोळी प्रक्रिया, सेंद्रिय शेती उत्पादनाचे प्रमाणीकरण आणि मधमाशी पालन यासारख्या व्यवसायवृद्धीच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडून कृषी विभागाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. कृषी विभागाच्या या पुढाकारामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक दिशा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अहेरीचे उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, तालुका कृषी अधिकारी चेतन पानबुडे, तसेच कृषी विभागाचे अन्य अधिकारी व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य उपस्थित होते.