कोटगल आणि चिचडोह प्रकल्पात शेती गेलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करा

खासदार अशोक नेते यांची मागणी, राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार

चिचडोह प्रकल्पाची पाहणी करताना खासदार अशोक नेते, सोबत अधिकारी व पदाधिकारी.

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज आणि गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेज प्रकल्पात शेती गेलेल्या सर्वच शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करावे, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केली आहे. त्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक बोलावण्यात येईल, अशी माहिती खा.नेते यांनी दिली.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. चिचडोह प्रकल्पात एकूण ४३४.५१ हे.आर. क्षेत्रापैकी ३४०.८८ हे.आर.जमीन संपादित झाली आहे. उर्वरीत जमीन संपादित करून शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी खा.नेते यांनी राज्य सरकारला केली आहे. सदर प्रकल्पासाठी सिंचन विभागाने राज्य शासनाकडे ६० कोटी रुपयांची मागणी केली आहे, या मागणीची पूर्तता सरकार लवकरात लवकर करेल, अशी अपेक्षा खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केली. या विषयावरील सततच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयात बैठकही बोलावण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत प्रकल्पाच्या जमिनीचे भूसंपादन केल्यानंतरही मोबदला मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकारने सदर ६० कोटी रुपये मंजूर केल्यास समस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्यास अडचण येणार नाही, ही बाब नेते यांनी राज्य शासनाला कळविली.

या विषयावर शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि अडचणी जाणून घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी चिचडोह प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट दिली. या प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रात आंघोळीसाठी गेलेल्या चार युवकांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. प्रकल्पाला सुरक्षा पुरविणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे प्रकल्प प्रतिबंधित क्षेत्रात त्या तरुणांचा प्रवेश झाला आणि त्यांचा बळी गेला. त्यामुळे मृत्यू पावलेल्या त्या युवकांच्या शोकाकुल कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत करावी, अशीही मागणी नेते यांनी केली. यावेळी भाजप एसटी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील वरघंटे, कान्होजी लोहोंबरे, सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.