शेतकऱ्यांचे वीज संकट दूर केल्याबद्दल आ.कृष्णा गजबे यांचे जंगी स्वागत

उपोषण आणि पाठपुराव्याची फलश्रुती

देसाईगंज : तालुक्यातील कृषी पंपधारकांना दिवसा 12 तास सुरळीत वीज पुरवठा करून रबी हंगामातील पिकावरील सिंचनाचे संकट दूर करण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नानंतर देसाईगंजमध्ये दाखल झालेल्या आमदार कृष्णा गजबे यांचे शेतकऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.

कृषीपंपाला केवळ 8 तास वीज पुरवठा मिळत असल्याने तालुक्यातील पीक पाण्याअभावी संकटात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. यासाठी खा.अशोक नेते यांच्यासह आ.गजबे यांनी पालकमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रश्न लावून धरला. त्यानंतर आ.कृष्णा गजबे यांनी मुंबईपर्यंत जाऊन हा प्रश्न सोडवल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निश्चय केला. 12 तास वीज मिळेल असे सांगूनही वीज पुरवठा 8 तासावर कसा आला असा प्रश्न करत शेतकऱ्यांनी त्यांच्यावर काहीसा रोष व्यक्त केला होता. वीज पुरवठ्याच्या मागणीत झालेली वाढ आणि इतर तांत्रिक अडचणी दूर करून गडचिरोलीला पुरेसा वीज पुरवठा द्या, यासाठी आ.गजबे यांनी मुंबईत ठाण मांडले.अखेर त्याला यश आले.

विद्द्युतत पुरवठा सुरु असताना व्यत्यय येऊ नये यासाठी शंकरपूर पॉवर स्टेशनला अतिरिक्त वीज पुरवठा व्हावा यासाठी सावंगी व लाखांदुर फिडरवरुन वीज जोडणीच्या कामास मंजुरी मिळवून तात्काळ हे काम सुरु करण्यात आले. यासह 10 मेगावॅटचे अतिरिक्त फिडरही बसवुन देण्याची मागणी पुर्ण करवुन घेतली. त्यामुळे देसाईगंजमध्ये पोहोचताच मुख्य चौकात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

लाखांदुर-ब्रम्हपुरी टी पॉईंट चौकात पुष्पहार घालुन आ.गजबे यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भाजप कार्यकर्त्यांनी ढोलताश्यांसह जल्लोषात मिरवणूक काढली. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते किशन नागदेवे, जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, नरेश विठ्ठलानी, भाजप तालुकाध्यक्ष सुनील पारधी, किसान आघाडीचे तालुका प्रमूख केवळराम झोडे, शहर तालुका अध्यक्ष सचिन खरकाटे, गोपाल उईके, प्रिती शंभरकर, मोहन गायकवाड, शालु दंडवते, रोशनी पारधी, अर्चना ढोरे, शेवंता अवसरे, वसंता दोनाडकर, भारत बावथळे, रेवता अलोने, भाजप कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते.