राजोली गावात शिरला नदीचा पूर, घरात-रस्त्यावर कंबरभर पाणी

पहा हा व्हिडीओ, गावकरी म्हणतात पुनर्वसन करा

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यात येणारे राजोली हे एक नदीकाठावरील छोटेसे गाव. निसर्गाच्या कुशीतील या गावात एरवी कोणती नैसर्गिक समस्या नाही, पण जोराचा पाऊस आला की येथील गावकऱ्यांची झोप उडते. कारण नदीला कधी पूर येईल आणि नदीचे पाणी गावात आणि आपल्या घरात शिरेल, अशी भिती गावकऱ्यांना असते. सोमवार दि.१७ च्या रात्री गावकऱ्यांची ती भिती खरी ठरली आणि दि.१८ ला पहाटेपासून हे गाव जलमय झाले.

पहाटे जसजसी पाण्याची पातळी वाढू लागली तसतसा गावकऱ्यांचा जीव वरखाली होऊ लागला. पाहता पाहता पुराचे पाणी घरात शिरले आणि एकच धांदल उडाली. जीव सुरक्षित ठेवायचा की घरातील सामान, अशी स्थिती निर्माण झाली. अनेकांचे साहित्य भिजले, काहींना गुरे-ढोरे गमवावी लागली. स्वयंपाक कुठे करायचा याचेही वांदे झाले. शाळकरी मुलांची पुस्तकेही पाण्याने ओली झाली. अखेर संध्याकाळी हे पाणी उतरले. पण या पाण्याने अनेकांच्या कच्च्या घराच्या भिंतीही पोखरून काढल्या. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासोबत आमचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करा, अशी मागणी आता गावकरी करू लागले आहेत. गुरूवारी (दि.२०) गावच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत निवेदन देऊन नुकसानभरपाई देण्यासोबत लवकरात लवकर पुनर्वसन करण्याची मागणी केली.

यापूर्वी १९९४ आणि २०१० मध्ये अशाच पद्धतीने पुराचे पाणी गावात शिरून मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी या गावकऱ्यांचे पुनर्वसन पोटेगाव येथे करण्याची तयारी प्रशासनाने दाखविली होती, पण गावकऱ्यांचा त्यावेळी विरोध होता. आता गावकऱ्यांचे मतपरिवर्तन झाले असून त्यांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे.