मकर संक्रांतीच्या पर्वावर प्रधानमंत्री आदिवासी न्याय अभियानाचा शुभारंभ

आदिवासींच्या उत्थानासाठी विशेष प्रयत्न- खा.नेते

गडचिरोली : मकर संक्रांतीच्या पर्वावर दि.१५ ला प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानाचा शुभारंभ गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव येथे करण्यात आला. दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींना रस्ते, पाणी, आरोग्य, दूरसंचार, वीज आणि घरे यासारख्या मूलभूत गरजा पुरविण्यासाठी आणि आदिवासी समुदायात विकासाबाबत जागरूकता आणण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहेत. परंतू अजूनही जे वंचित आहेत त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी आणि आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान मोदी विशेष प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (पीएम जनमन) राबविले जाणार असल्याचे यावेळी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते म्हणाले.

खासदार नेते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॅान्फरन्सिंगद्वारे आदिवासी नागरिकांना त्यांच्यासाठी सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती देऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. एकाचवेळी देशातील विविध ठिकाणच्या आदिवासी भागात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

गडचिरोली जिल्ह्यात हा कार्यक्रम पोटेगाव येथे घेण्यात आला. यावेळी प्रामुख्याने आ.डॉ.देवराव होळी, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, सहायक जिल्हाधिकारी राहुल मिना, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोळंकी, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत तिडके, तहसीलदार महेंद्र गणवीर, पोटेगांवच्या सरपंच अर्चना सुरपाम, सावेलाच्या सरपंच सुरेखा मडावी, राजोलीच्या सरपंच कांता हलामी, माजी पं.स. सदस्य मालता मडावी, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी आदिवासींच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या दूरदर्शी उपक्रमांची माहिती देण्यात आली. विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी अनेक ठिकाणच्या नागरिकांशी लाईव्ह संवादही साधला.