भाजपने तयार केले विधानसभानिहाय १०० योद्धे, रोज करणार हे काम

प्रदेशाध्यक्षांनी घेतला कार्यकर्त्यांचा क्लास

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोलीत जनसंपर्क करून कार्यकर्त्यांचा क्लास घेतला. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून निवडक १०० कार्यकर्त्यांना वॅारिअर्स, अर्थात योद्धे म्हणून निवडून त्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी रोज कोणते काम करायचे याचे टार्गेटही त्यांना देण्यात आले.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात मोठ्या असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या एक दिवसीय प्रवासात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.

गडचिरोलीनंतर त्यांनी ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौकातून जनसंपर्क अभियानाला सुरूवात केली. तेथील लोढीया हॉलमध्ये ब्रह्मपुरी, चिमूर व आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या दौऱ्यात खासदार अशोक नेते, विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सा.पोरेड्डीवार, माजी आमदार अतुल देशकर, माजी आ.केशव मानकर, माजी आमदार संजय पुराम, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा संयोजक प्रमोद पिंपरे, लोकसभा निवडणूक प्रमुख किशन नागदेवे, रविंद्र ओल्लालवार, बाबुराव कोहळे, गोविंद सारडा, हरीश शर्मा, येशुलाल उपराडे, धर्मपाल मेश्राम, प्रकाश गेडाम, रेखा डोळस, मुक्तेश्वर काटवे,सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख व जिल्हा कार्यकारिणीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

झाडीपट्टीच्या नटसम्राटाची भेट
महाराष्ट्रातील दुर्गम भागात मनोरंजन व समाज प्रबोधनात अग्रेसर असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीचे नटसम्राट पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांची बावनकुळे यांनी भेट घेतली. झाडीपट्टी रंगभूमीची भरभराट व्हावी, त्यास नवी ओळख मिळावी यासाठी गडचिरोली भागात झाडीपट्टी महोत्सव आयोजित व्हावा, अशी मागणी त्यांनी बावनकुळे यांच्याकडे केली. या मागणीचा सरकारकडे पाठपुरावा करून हा महोत्सव साजरा करू, असा विश्वास त्यांना बावनकुळे यांनी दिला.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन
खासदार अशोक नेते यांच्या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील वॅार रुमचे आणि शिवकृपा ड्रायव्हिंग स्कूलचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.