गडचिरोली : जिल्ह्यातील मुलचेरा आणि अहेरी तालुक्यात दोन महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाच्या पथकाला यश आले. या वाघिणीने अनेक पाळीव जनावरेही मारली आहेत. याशिवाय दोन मनुष्यांना गंभीर जखमी केले. त्यामुळे या वाघिणीची दहशत पसरली होती. दरम्यान तिला जेरबंद करण्यासाठी नेमलेल्या पथकाने बेशुद्धीचे इंजेक्शन डागून तिला पिंजऱ्यात बंद केल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या वाघिणीकडून मानवी जीवितास धोका निर्माण झाला होता. दि.१६ जानेवारीपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची चमू मार्कंडा (कं), पेड्डीगुडम, चामोर्शी, घोट, वन्यजीव अभयारण्य चपराळा, गस्ती पथक आलापल्ली या वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी आणि कर्मचारी त्या वाघिणीवर पाळत ठेवून गस्त करत होते. त्यामुळे रितसर परवानगी घेऊन या पथकाने दि.१८ रोजी मार्कंडा वनपरिक्षेत्रातील रेंगेवाही नियतक्षेत्रात रात्री १० वाजता त्या वाघिणीवर बेशुद्धीचे इंजेक्शन डागून तिला पिंजऱ्यात बंद केले.
या कारवाईसाठी वनसंरक्षक एस.रमेशकुमार, आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया यांच्या मार्गदर्शनाखाली ताडोबातील वन्यजीव विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी तथा रॅपिड रेस्क्यू टीमचे प्रमुख डॅा.आर.एस.खोब्रागडे, शुटर अजय मराठे, रॅपिड रेस्क्यू टिमचे सदस्य दिपेश टेंभुर्णे, योगेश लाकडे, गुरूनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल वाटगुरे, ए.डी.कोरपे, ए.एम.दांडेकर, तसेच आलापल्लीचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी पी.डी.बुधनवर, उपविभागीय अधिकारी आर.एस.डेंगरे, आरएफओ भारती राऊत, क्षेत्र सहायक मांडवकर आणि वनपाल, वनरक्षक, वनमजुर यांनी मोठे परिश्रम घेतले.
विशेष म्हणजे ताडोबाच्या चमुने आतापर्यंत धुमाकूळ घालणाऱ्या अनेक वाघांना यशस्वीपणे जेरबंद केले आहे. ही वाघिण ६३ वी होती.