विरोधीपक्ष नेते, माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उद्या गडचिरोलीत

नागपूर विभागीय बैठकीचे आयोजन

गडचिरोली : काँग्रेस पक्षाचे नागपूर विभागीय शिबिर शनिवारी गडचिरोलीच्या महाराजा सभागृहात होणार आहे. या शिबिरासाठी काँग्रेसचे नवनियुक्त राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आदी अनेक नेते आणि विदर्भातील सर्व काँग्रेसचे आमदार तथा पदाधिकारी, कार्यकर्ते गडचिरोलीत येत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हानिहाय बैठक आणि त्यानंतर सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकत्रितपणे जाहीर सभा असे या विभागीय बैठकीचे स्वरूप राहणार आहे. यावेळी गडचिरोली शहरातून मोटरसायकल रॅलीही काढली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले.

डॅा.नामदेव किरसान यांच्या वाहनाला अपघात

काँग्रेसकडून गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे प्रबळ दावेदार समजल्या जाणारे डॅा.नामदेव किरसान यांच्या वाहनाला गुरूवारी रात्री सिंदेवाही तालुक्यात अपघात झाला. एका नाटकाच्या उद्घाटनावरून परत येत असताना समोरून येणाऱ्या एक स्कॅार्पिओ वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यामुळे डॅा.किरसान यांच्या डोक्याला जखम झाली. त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथे उपचार सुरू आहेत.