आमदार कृष्णा गजबे यांनी वेधले शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष

चर्चेत सहभाग, कोणत्या मागण्या केल्या? वाचा

गडचिरोली : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार कृष्णा गजबे यांनी सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील अल्पकालीन चर्चेत सहभागी होऊन आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.

जून-जुलै २०२३ मध्ये गोसीखुर्द धरणातून अचानक करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला मोठा पूर येवून नदीकाठच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना अनुदान तातडीने देण्यात यावे, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आॅगस्ट २०१९-२० मधील अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना भरपाई स्वरूपात त्यांनी उचल केलेल्या कर्जापैकी २ हेक्टरच्या मर्यादेत पिक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरीता आवश्यक निधी आयुक्त, सहकार विभाग पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असताना शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आरमोरी मतदार संघातील वडसा, आरमोरी, कुरखेडा तालुक्यात मोहरा व इतर उच्च प्रतीच्या धान पिकाचा निसवा होत असताना पांढऱ्या लोंब्यामुळे उत्पन्नात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी आ.गजबे यांनी केली. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधताना या जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभारही मानले.