शेतकऱ्यांच्या कृषीपंपांसह घरकुलांना तातडीने विद्युत मीटर उपलब्ध करा

आढावा बैठकीत खा.अशोक नेते यांचे निर्देश

गडचिरोली : गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय विद्युत कमिटीची आढावा बैठक झाली. यावेळी खासदार नेते यांनी वीजेच्या समस्या, कनेक्शन, थकबाकी यांचा आढावा घेताना वीज वितरणातील प्रस्तावित कामे लवकरात लवकर करण्याची, तसेच शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना आणि घरकुलांना तातडीने वीज मीटर उपलब्ध करून देण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, आमदार कृष्णा गजबे, अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, कार्यकारी अभियंता आर.के.गाडगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत, कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, कार्यकारी अभियंता डोंगरवार, हेडाऊ, कुंभरे तसेच महावितरणचे अनेक अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

लोडशेडिंग टाळण्याकरिता अविरत वीज पुरवठा करण्यासाठी मंजूर सबस्टेशनचे काम तातडीने पूर्ण करावे. ज्या ठिकाणी ट्रान्सफार्मरची वाढीव मागणी आहे, त्या ठिकाणी तातडीने ट्रान्सफार्मर लावणे, जिल्ह्यात जे घरकुल मंजूर झाले त्या घरकुलांसाठी ज्यांची मागणी असेल त्यांना वीज पुरवठा लवकर उपलब्ध करून द्यावा, कृषीपंप जोडणी उपलब्ध करावी. ग्रामीण व अतिदुर्गम भागात प्रत्येक घराघरांमध्ये वीज पुरवठा मिळाला पाहिजे त्याकरिता डिमांड स्वीकारून तातडीने मीटर उपलब्ध करून द्यावे, शेतीला अखंडीत वीज पुरवठा करावा, पावसाळ्यात वनव्याप्त भागात वीज पुरवठा खंडित न होण्याकरता केबलिंग, अशा सूचना या आढावा बैठकीत खासदार नेते यांनी केल्या.