राष्ट्रीय महामार्गावरच्या नवनिर्मित पुलावरील लोखंडी बेल्ट उखडून झाला उभा

कामाच्या दर्जावर निर्माण झाले प्रश्नचिन्ह

गडचिरोली : गडचिरोली ते चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावरील येवली गावजवळच्या पुलावरील एक्स्पान्शन जॅाईन्ट बेल्ट (लोखंडी पट्टी) शनिवारी सकाळी पुलावरील मध्यभागी तुटून उभा झाला. त्यामुळे त्या लोखंडी बेल्टवर वाहन आदळून अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती. पेट्रोलिंग करणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांनी तातडीने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्या ठिकाणी दुरूस्तीचे काम सुरू केले.

गडचिरोली ते चामोर्शी या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर केल्यानंतर या मार्गाचे विस्तारीकरण आणि सिमेंटीकरण करण्यात आले. त्यासाठी या मार्गातील काही पुलांचीही नव्याने उभारणी करण्यात आली. पुलाच्या पिलरवर स्लॅब रचताना दोन स्लॅबममधील पातळी एकसमान राहावी, वाहनांच्या वर्दळीने ते खाली-वर होऊ नयेत यासाठी त्यांच्या जॅाईंटवर एक्स्पान्शन जॅाईन्ट बेल्ट म्हणून मजबूत अशी लोखंडी पट्टी लावली जाते. येवली येथील पुलावरील अशीच एक लोखंडी पट्टी उखडून एका बाजुने उभी झाली.

पुलाच्या मध्येच ही लोखंडी पट्टी उभी झाल्यामुळे भरधाव येणारे वाहन त्यावर धडकून अपघात होण्याची दाट शक्यता होती. वेळीच ही बाब लक्षात आणून दिल्याने त्या ठिकाणी दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले. पण नव्याने उभारलेल्या पुलावर अल्पावधीत दुरूस्ती करावी लागणे हे त्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.