जमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची आमदार होळी यांना भावनिक साद

मुधोली चक नं.२ येथील सभेत घातले साकडे

चामोर्शी : तालुक्यातील मुधोली चक नं.२ येथे शेतकऱ्यांची जमीन उद्योगांसाठी देण्यासंदर्भात शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी आले होते. यावेळी मुधोली चक नं.२, जयरामपूर, सोमनपल्ली, गणपूर, मुधोली तुकूम, लक्ष्मणपूर येथील शेतकऱ्यांनी भावनिक साद घालत आमचा जमिनी देण्यासाठी विरोध का आहे, हे सांगितले. तसेच सरकारकडे केल्या जात असलेल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

या मागण्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहण करणारा आदेश रद्द करावा, शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्यासाठी येत असलेल्या शासनाच्या अधिकाऱ्यांना थांबवा, परिसरातल्या लोकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग होणार नाही, कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली शेतकऱ्यांचे हक्क डावलले जाणार नाही यासाठी पोलिस प्रशासननाला सूचना कराव्या अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी परिसरातील गावांमधील महिला-पुरुष उपस्थित होते.