वनरक्षक भरतीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या उमेदवारांना गडचिरोलीत मिळाला निवारा

रायुकाँने केली निवास व भोजनाची सोय

गडचिरोली : वनविभागात वनरक्षक पदाच्या मैदानी चाचणीसाठी राज्याच्या विविध भागातून, तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम भागातून येणाऱ्या युवक व युवतींसाठी गडचिरोलीत नि:शुल्क निवास व भोजनाची सोय राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली. त्यामुळे या बेरोजगार युवांना हक्काचा निवारा मिळाला आहे. स्थानिक चंद्रपूर मार्गावरील पटेल मंगल कार्यालयात भरती प्रक्रियेपर्यंत ही सोय दररोज राहणार आहे.

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या उद्दिष्टानुप चालणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने यापूर्वी पोलिस भरतीसाठी आलेलल्या युवक-युवतींसाठीही अशाच पद्धतीने व्यवस्था केली होती. सध्या जिल्ह्यात वनरक्षक भरतीसाठी 21 जानेवारीपासून मैदानी चाचणी घेणे सुरू झाले आहे. 200 जागांकरीता असलेल्या भरती प्रक्रियेकरीता जवळपास 10 हजार उमेदवार सहभागी होणार आहेत. या मैदानी चाचणीसाठी गडचिरोली जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातील गोरगरीब उमेदवार येत असतात. त्यांना गडचिरोलीमध्ये आल्यावर राहण्याची व भोजनाची सोय करताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अनेक उमेदवार थंडीचे दिवस असूनही रस्त्यालगत, बसस्थानक परिसरात रात्रीला उघड्यावर विसावा घेतात. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्या मार्गदर्शनात या उमेदवारांची राहण्याची व भोजनाची मोफत सोय करण्यासाठी पुढाकार घेतला.

बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कुणाल चिलगेलवार, हिमांशू खरवडे, चेतन पेंदाम, रितिक डोंगरे, गणेश बावणे यांच्याशी संपर्क साधावा. या उपक्रमासाठी वरील पदाधिकाऱ्यांसह जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रा.रिंकु पापडकर, श्रीनिवास गोडसेलवार, सौरभ खोब्रागडे, रणजित रामटेके, पराग दांडेकर, अंकुश झरली व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत.